ग्रामस्थांची सोय : येर्रावागू नाल्यावर रस्ता बनविला आसरअल्ली : रविवारी आसरअल्ली-सिरोंचा मार्गावर येर्रावागू नाल्याजवळील चिखलात तीन गरोदर महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली होती. या घटनेनंतर आसरअल्ली व अंकिसा येथील गावकऱ्यांच्या सहाय्याने पोलिसांनी पुढाकार घेऊन या चिखलाच्या रस्त्यावर गिट्टी व मुरूम टाकून चांगला रस्ता वाहतुकीसाठी सोमवारी बनविला. रविवारी गरोदर महिलांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकल्यानंतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ती कशीबशी काढली. मात्र चिखलाची परिस्थिती रस्त्यावर कायमच होती. या बाबीची दखल घेत आसरअल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल कदम, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, गुट्टुरवार, हवालदार मडावी यांच्यासह २५ पोलीस जवान व आसरअल्ली, अंकिसा येथील गावकऱ्यांच्या सहाय्याने ट्रॅक्टर, जेसीबी लावून येर्रावागू नाल्यामध्ये १० तास श्रमदान करून रस्ता तयार करण्यात आला. या कामी २० ट्रॅक्टर लावण्यात आले होते. जवळजवळ ४० ट्रॅक्टर गिट्टी व मुरूम या भागात टाकून रस्ता तयार करण्यात आला. हा रस्ता तयार झाल्यामुळे गावकरी, नागरिक, शाळकरी मुले यांना सोयीचे होणार आहे. बस व ट्रक यांनाही ये-जा करण्यास सुलभता होईल. याप्रसंगी आसरअल्ली येथील गजानन कलाक्षपवार, श्रीकांत सुगरवार, रमेश तैनानी, शेड्डा, श्रीरामुलू, रमेश यप्पीडी, संजय चिंतकाणी, अंकिसा येथील उपसरपंच व्यंकटेश्वर येनगंटी, तंमुस अध्यक्ष धर्मय्या कोठारी, वाहिद, महेश आकुला, प्रितम आदी उपस्थित होते. येर्रावागू नाल्यावर बांधकाम सुरू आहे. परंतु हा पूल व रस्ता तयार होण्यास वर्षाचा कालावधी लागणार असल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन श्रमदानातून रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे आता वाहनचालकांना दिलासा मिळेल. (वार्ताहर)
गावकरी, पोलिसांनी श्रमदानातून टाकला मुरूम
By admin | Updated: August 10, 2016 01:45 IST