आमदारांची भेट : छायातार्इंचे केले कौतुकगडचिरोली : गडचिरोली येथील तैलचित्रकार छाया अरविंद पोरेड्डीवार यांच्या तैलचित्रांची प्रदर्शनी मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आली होती. या चित्रप्रदर्शनीस गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, अहेरीचे आमदार अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम, आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी भेट दिली व छाया पोरेड्डीवार यांनी काढलेल्या तैलचित्रांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी सदर तैलचित्र प्रदर्शनी पाहून तिनही आमदार भारावले. तैलचित्रकार छाया अरविंद पोरेड्डीवार यांची तैलचित्राची प्रदर्शनी १५ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आली. या प्रदर्शनीत गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती व विदर्भातील कलाकृती याबाबतच्या तैलचित्रांचा समावेश आहे. या कलाकृतीस कलाप्रेमी, संग्रहक व कलाकारांनी अतिशय जिव्हाळ्यांनी चौकशी करून या तैलचित्रांची मुक्तकंठाने स्तुती केली. या प्रदर्शनीस प्रसाद पंडीत, ओक व भेंडे या सिनेकलावंतांनी भेट दिली. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यातील हैदरभाई पंजवानी, पप्पू नागदेवे, डेंगानी, जेजानी, सतपाल आदींनी सुद्धा भेट देऊन तैलचित्रकार छाया पोरेड्डीवार यांचे कौतुक केले. जहांगीर आर्ट गॅलरीसारख्या जागतिक दर्जा असलेल्या गॅलरीत आपण काढलेल्या तैलचित्रांची प्रदर्शनी भरविण्यात आपल्या कलेला सन्मान व दर्जा मिळाला असल्याचे तैलचित्रकार छाया पोरेड्डीवार यांनी म्हटले आहे.
तैलचित्र प्रदर्शनी पाहून आमदार भारावले
By admin | Updated: October 25, 2014 22:39 IST