भाजपात प्रवेशाबाबत अटकळबाजी सुरू अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नागपूर स्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला गुरूवारी भेट दिली. त्यांच्या भेटीचा तपशील सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने धर्मरावबाबा आत्राम यांच्या भाजप प्रवेशाबाबत अटकळबाजीला ऊत आला आहे. धर्मरावबाबा आत्राम यांचे भाजपशी यापूर्वीही निकटचे संबंध राहिले आहे. २०१२ मध्ये आपली कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी भाजपशी संधान साधले होते. तसेच यावेळीही जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता स्थापनेसाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात दिला. काँग्रेसकडून पाठींब्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाही आत्राम भाजपच्याच बाजुने राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे अहेरी येथे बराच काळ पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आत्राम कुटुंबियांशी त्यांचा संबंध राहिला आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम पुढच्या काळात भाजपात प्रवेशावरून अटकळबाजीला ऊत आला आहे. मात्र या संदर्भात धर्मरावबाबा आत्राम यांना विचारणा केली असता, आपले व संघाचे जुने संबंध आहे. त्यामुळे आपण नागपूर मुख्यालयात गेलो होतो, असे ते म्हणाले. धर्मरावबाबा आत्राम यांचे संघ मुख्यालयात संघाचे विभागीय प्रचारक सुनिल मेहर व प्रांत प्रचारक प्रसन्ना महानकर यांनी स्वागत केले. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांना एक प्रतिमाही भेट देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
राकाँ नेत्याच्या संघ भेटीने चर्चेला ऊत
By admin | Updated: April 9, 2017 01:25 IST