मेळाव्यात मागणी : पाच महिन्यांपासून मानधन रखडलेअहेरी : अहेरी बाल विकास प्रकल्पातील अंगणवाडी महिलांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्याचबरोबर वाढीव मानधनाची थकबाकी दोन वर्षांचा कालावधी उलटूूनही देण्यात आले नाही. थकीत मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी अंगणवाडी महिलांच्या मेळाव्यात करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसाला मानधनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. दोन वर्षांपासून वाढीव मानधन देण्यात आले नाही. त्याचबरोबर एप्रिल महिन्यापासूनचे पाच महिन्यांचे मानधन थकले आहे. अंगणवाडी महिलांना आधीच अत्यंत कमी मानधन दिले जाते. त्यातही सदर मानधन नियमितपणे दिले जात नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांमध्ये दिवाळी आली असतानाही शासनाने सुमारे पाच महिन्यांपासूनचे मानधन दिले नसल्याने ऐन दिवाळीत आर्थिक चणचणीचा सामना करावा लागणार आहे. शासनाने दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वितरित करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मेळाव्यातून दिला. मेळाव्याला संगीता वडलाकोंडावार, प्रा. रमेशचंद्र दहिवडे, डी. एस. वैद्य, रेखा गोंगले, वनीता कुंभारे, छाया कोतकोंडावार, यशोदा दुर्गे यांच्यासह अहेरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा धिक्कार केले. अंगणवाडी महिलांच्या समस्यांकडे शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिवाळीपूर्वी थकीत मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 01:40 IST