पथक बंद करू नका : महिला संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे मागणीकुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही काही ठिकाणी दारू विक्री सुरू आहे. याचा त्रास महिला व मुलांना सहन करावा लागत आहे. कुरखेडा तालुक्यातील काही गावातील महिला व ग्रामसभांनी निर्णय घेऊन दारूबंदी मोहीम सुरू केलेली आहे. ती सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी विविध महिला संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. क्रांती ज्योती महिला संघटना, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा व कोरची तालुक्यातील दारूबंदी समित्या यांची ९ जून रोजी बैठक कुरखेडा येथे पार पडली. या बैठकीत शिरपूर, कोरची, कुरखेडा येथील दारूबंदीच्या स्थितीबाबतची चर्चा करण्यात आली. शिरपूर येथील महिलांनी कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथे दारू विक्री करताना काहींना पकडून दिले. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे निर्देशनास आले. जिल्ह्यातील विशेष दारूबंदी पथक बरखास्त करण्यात येत असल्याचे प्रसार माध्यमातील बातम्यांवरून दिसून येत आहे. कुरखेडा, कोरची तालुक्यात दारू बंदीसाठी महिला समित्यांना पोलिसांचे सहकार्य मिळावे. तसेच दारू विक्री करणाऱ्या अनेकांकडे मोहफूल साठा मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबत कोरची व कुरखेडा येथील पोलीस निरिक्षकांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या बैठकीला क्रांती ज्योती महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा नाकाडे, शिरपूरचे उपसरपंच रमेश बावणथडे, शुभदा देशमुख, कुमारीबाई जमकातन, रूहेलीन बागडेरीया आदींसह शिरपूरच्या महिला उपस्थित होत्या. पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कुरखेडा तालुक्यात दारूबंदी करण्यात यावी, तसेच कुरखेडा शहरात चोरून चालणाऱ्या दारू विक्रीवरही आळा घालण्यात यावा, अशी मागणी सुधा नाकाडे, शिरपूरचे उपसरपंच रमेश बावणथडे, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, कुमारी जमकातन, क्रांतीज्योती महिला संघटना चंद्रपूर गडचिरोलीच्या आशा बानबले, उपाध्यक्ष रूहेलीन बागेडीया, रजोला सोनार, शिरपूर दारूबंदी समितीच्या सदस्य अनुसया जुन्नाके, सत्यभामा आडे, पे्रमिला हलामी, सुनिता मडावी, दिव्या सोनकुसरे, नलीनी आगलावे आदींनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यात दारूबंदी करा
By admin | Updated: June 12, 2016 01:21 IST