वाहनधारक त्रस्त : एटापल्ली-गट्टा, जारावंडी, चंदनवेली मार्ग उखडलेएटापल्ली : एटापल्ली तालुका मुख्यालयास जोडणाऱ्या एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-जारावंडी व एटापल्ली-चंदनवेली हे तिन्ही प्रमुख डांबरी मार्ग पूर्णत: उखडले असून या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी आवागमन करणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. एटापल्ली-जारावंडी हा ५५ किमी अंतराचा रस्ता पूर्णत: उखडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. सदर मार्ग अत्यंत दुरवस्थेत असल्याने या मार्गासाठी वाहन भाड्याने दिले जात नाही. त्यामुळे या मार्गावरून दुचाकीने प्रवास करावा लागतो. मात्र दुचाकीचा प्रवासही अत्यंत खडतर आहे. जारावंडी, कसनसूर, हालेवारा येथील नागरिकांनी अनेकदा राजकीय पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर रस्ता दुरूस्तीची मागणी केली. मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुरूस्तीकडे दुर्लक्ष आहे. रस्ता पूर्णत: उखडल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे गर्भवती महिला या मार्गाने प्रवास करू शकत नाही. पोलीस विभागाला सुध्दा अनेक अडचणी येत आहेत. पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)शिवसेना आंदोलन करणारएटापल्ली तालुक्यातील सर्वच प्रमुख मार्गाची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दुरूस्ती न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा शिवसेनेचे एटापल्ली येथील उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुल्भावार यांनी दिला आहे.
प्रमुख तिन्ही मार्गाची दुरवस्था
By admin | Updated: August 15, 2016 00:45 IST