ठिय्या आंदोलन : जनहितवादी समिती, सूरजागड बचाव संघर्ष समितीची मागणी एटापल्ली : सूरजागड लोह प्रकल्पासंबंधित क्रशर व मुख्य स्टिल प्लॅन्ट कोनसरी, आष्टी ऐवजी एटापल्ली किंवा आलापल्ली, भामरागड, अहेरी परिसरात उभारून जिल्ह्यातील बेराजगारांना अ ते ड वर्ग पर्यंत कायम नोकऱ्या, रोजगार व मजुरी मिळवून देण्यात यावे, तसेच या प्रकल्पासाठी लागणाऱ्या तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीला घेऊन जनहितवादी समिती, सूरजागड बचाव संघर्ष समिती, अहेरी जिल्हा कृती समिती तालुका एटापल्लीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय एटापल्ली समोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लायड्स मेटल कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकास निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सूरजागड व अन्य लोह प्रकल्पामुळे एटापल्ली तालुक्यात निसर्ग, वनसंपत्ती व ग्रामसभांचे गौण वनउपज, वन्यजीव यांची मोठी हानी होणार आहे. प्रदूषणामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. या नुकसानीच्या बदल्यात वन व गौणवनउपज तसेच इतर नुकसान भरपाई व्यवस्थापन करण्यात यावे, शासनाने ५० टक्के रॉयल्टी अकविसित भागात खर्च करावी, ग्रामसभांनाही कंपनीने नफ्याची वाटणी द्यावी, कंपनीने लोह खनिज प्रकल्प उद्योग अहेरी उपविभागातच उभा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा जनहितवादी समिती तथा सूरजागड संघर्ष समितीचे संयोजक सुरेश बारसागडे, अहेरी जिल्हा कृती समितीचे निर्मला गोटा/आेंगुलवार, ग्रामसभा एकराचे सचिव रामू गोटा, जनहितवादी समितीच्या सहसचिव सरिता पुंगाटी आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
मुख्य प्रकल्प अहेरी उपविभागात उभारा
By admin | Updated: March 2, 2017 01:59 IST