गडचिरोली : सुरजागड येथील लॉटड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेडने खाणीत विस्फोटक लावण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. त्यावर जिल्हा ग्रामसभा स्वायत्त परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवत परवानगी न देण्याची मागणी केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिज खाणीमध्ये ब्लास्टिंगद्वारा खोदकाम करण्यास लॉटड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला परवानगी देण्याच्या प्रस्तावाविरुद्ध सुरजागड इलाका पट्टीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी यांचेकडे आक्षेप व हरकती नोंदविल्या होत्या. ग्रामसभा स्वायत्त परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही आक्षेप नोंदवत परवानगी न देण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात नमूद केल्यानुसार, पंचायत उपबंध अधिनियम १९९६ च्या तरतुदी लागू असताना लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड यांना २००४ मध्ये सुरजागड खाण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यात पेसा कायदा १९९६ चा भंग केल्याप्रकरणी खाण रद्द करण्यासाठी वारंवार निवेदने दिली, आंदोलन केले. स्थानिक जनता, ग्रामसभांचा विरोध असताना पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत देण्यात आले. यात ग्रामसभांच्या अधिकारांचे हनन झाल्याचा आरोप करण्यात आला.
या खाण प्रभावित क्षेत्रातील गौण वन उपज आणि त्यावरील मालकी हक्क नष्ट होत असल्याने त्याऐवजी पर्यायी उपाययोजना काय? पर्यायी रोजगाराची व्यवस्था काय? आदिवासी माडिया समाजाच्या प्रथा, परंपरांच्या रक्षणाची पर्यायी व्यवस्था काय? असे अनेक प्रश्नही या निवेदनातून विचारण्यात आले. या निवेदनावर महाग्रामसभेचे संघटक शिवाजी नरोटे, उपाध्यक्ष नंदू मट्टामी, सदस्य सुधाकर गोटा, एस. बी. कोडापे यांच्या सह्या आहेत.