आमदारांनी केली पाहणी : देसाईगंज तालुक्यात पोटगावात कार्यक्रमदेसाईगंज : इटियाडोह प्रकल्पाचे पाणी बाराही महिने उपलब्ध होत असल्याने देसाईगंज व आरमोरी तालुक्यात उन्हाळी धान पिकाची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. धान पिकाच्या लावणीपासून ते काढणीपर्यंत मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. मजुरांची टंचाई हा एक नवा प्रश्न भेडसावत असल्याने आता धान काढणीसाठी यंत्राचा वापर केला जात आहे. देसाईगंज तालुक्याच्या पोटगाव येथे हिरालाल कुथे या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभागामार्फत यंत्राद्वारे धान काढणी कार्यक्रमाचे प्रात्याक्षिक १३ मे रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला देसाईगंजचे आमदार क्रिष्णा गजबे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी थोटे, सहायक कृषी अधिकारी पवार यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. पंचायत समिती देसाईगंज व कृषी विभाग (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. प्रात्यक्षिक यशस्वीतेसाठी चांगदेव हरडे, गणेश शेंडे, सुरेंद्र दोनाडकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
यंत्राने कापले जात आहे धान
By admin | Updated: May 14, 2016 01:30 IST