नळ योजना बंद : ७२९ मजुरांनी केली आहे कामाची मागणीजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीने मागील दीड महिन्यांपासून रोहयो काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे रोहयो मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे तर दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असतानाही दोन महिन्यांपासून येथील नळ योजना बंद पडली आहे. परिणामी महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. किटाळी गटग्रामपंचायत अंतर्गत एकूण १ हजार २३३ रोहयो मजूर असून त्यापैकी ७२९ मजुरांनी कामाची मागणी केली आहे. मजुरांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने दोन पांदन रस्त्यांची कामे ७ जानेवारी रोजी हाती घेतली. ही कामे दोनच हप्ते करून मंडई असल्याचे कारण पुढे करून काम बंद केले. दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सदर काम सुरू करण्यात आले नाही. यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे शेतमजुरांसह शेतकरीवर्गही कामाची मागणी करीत आहे. ग्रामपंचायतीकडे रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित असतानाही सदर कामे सुरू करण्यात आले नाही. काम उपलब्ध करून देण्याबाबत रोहयो मजुरांनी अनेकवेळा कामाची मागणी केली आहे. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. मागणी करताच रोहयो काम उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहेत. मात्र निष्क्रीय ग्रामपंचायत प्रशासनामुळे रोहयो काम मिळण्यास अडचण होत आहे. किटाळी येथील नळ योजना दोन महिन्यांपासून बंद आहे. येथील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. येथील नळ योजनेची मोटार जळाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या खात्यामधून दहा हजार रूपये काढून दुरूस्त करण्यात आली. मात्र पुन्हा काही दिवसातच मोटार बंद पडली. दोन महिन्यांपासून नळ योजना बंदस्थितीत आहे. नळ योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)आंदोलनाचा इशाराकिटाळी येथील दुष्काळ सदृष्य परिस्थिती असतानाही प्रशासनाने काम उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे रोहयो मजूर संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे केवळ किरकोळ दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीने लाखो रूपयांची नळ योजना बंद पाडली आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. आताच महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे रोहयो मजूर व महिला मिळून आंदोलन छेडणार आहेत, असा इशारा पोलीस पाटील वामन बांबोळे, नीलकंठ मंगर, नवनाथ सयाम, लोमेश्वर देशमुख, कवडू देशमुख, ऋषी मंगरे, रेवनाथ बोरकुटे यांनी दिला आहे.
किटाळीत मजुरांची उपासमार पाण्यासाठीही हाहाकार
By admin | Updated: March 7, 2016 01:06 IST