गडचिरोली : १९९२ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर कोणत्याही पोलीस अधीक्षकाने गंभीरपणे अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नव्हत्या. या कामात पुढाकार घेणारे संदीप पाटील हे पहिले पोलीस अधीक्षक ठरले. त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात प्रचंड कंबर कसली होती. शिवाय पोलीस दलालाही व्यसनमुक्त करण्याच्या कामाला चालना दिली होती. राज्य सरकारने बुधवारी राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. यात संदीप पाटील यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पाटील यांच्या जागेवर सातारा येथून अभिनव देशमुख हे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीला येणार आहेत. गडचिरोली येथे दोन वर्षापूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून येण्यास राज्यातील अधिकारी तयार होत नसल्याने तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी संदीप पाटील यांना येथे रूजू होण्यास सांगितले. पाटील यांनी आपल्या काळात नक्षल चळवळीला नियंत्रणात आणण्यात प्रचंड प्रमाणात यश मिळविले. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नक्षल आत्मसमर्पण त्यांनी घडवून आणले. नक्षल चळवळीचा शस्त्राने व सामाजिकस्तरावर मुकाबला करण्याचे काम पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांनी हाती घेतले. अनेक लोकोपयोगी उपक्रम गडचिरोली पोलीस दलाने विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविले. दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलीस ठाण्याचा विस्तार, आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची कल्पना पाटील यांनी प्रत्यक्षात आणली. १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध दारू विक्री विरोधात त्यांनी गठीत केले. कढोली व अन्य भागातही महिलांचे मेळावे घेऊन दारूबंदीच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. महाराष्ट्र शासनाने संदीप पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्तीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कारामुळे प्रेरणा घेऊन पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांमधील वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी व्यसनमुक्तीचा खास कार्यक्रम हाती घेतला. संदीप पाटील यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल लोकमत वृत्तपत्र समुहानेही घेऊन त्यांना महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर (विभागीय प्रशासकीय सेवा) हा पुरस्कार देऊन मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित केले. संदीप पाटील यांच्या बदलीमुळे व्यसनमुक्ती व अवैध दारू विक्री विरोधातील कारवायांना आता लगाम बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस दलाचे अनेक अधिकारी हे काम पोलिसांचे नाही, अशा मानसिकतेत राहतात. याचा अनुभव आजवर आलेला आहे. मात्र पाटील याला अपवाद ठरले होते. त्यांनी नक्षल चळवळीलाही काबूत ठेवण्यात यश मिळविले. (जिल्हा प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांच्या बदलीने दारूबंदीच्या कामावर परिणाम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2016 01:47 IST