अहेरी : स्थानिक एसटी आगारात १६ ते ३१ जानेवारीदरम्यान इंधन बचत पंधरवडा राबविला जात असून यानिमित्त उद्घाटन कार्यक्रमात चालकांना इंधन बचतीचे महत्त्व सांगून इंधनाची बचत कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इंधन बचत पंधरवड्याचे उद्घाटन आयटीआयचे इंधनतज्ज्ञ हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अभियंता प्रमोद राऊत, प्रमुख अतिथी म्हणून आगार प्रमुख एफ. के. राखडे, प्रकाश दुर्गे, टी. जी. चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी इंधन बचत करणाऱ्या चालक अशोककुमार युग, जे. पी. इंगळे, पी. ए. भोंगरे, व्ही. जी. शेडमाके यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यादरम्यान डिझेल बचतीचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष मशीनद्वारे करून दाखविण्यात आले. भविष्यात इंधनाची तीव्र टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे जेवढी बचत करणे शक्य होईल, तेवढी इंधनाची बचत करावी. इंधन बचत करणाऱ्या चालकांचा आदर्श समोर ठेऊन इतर चालकांनीही इंधनाची बचत करावी, एसटीचा सर्वाधिक उत्पन्न इंधनावर खर्च होतो. इंधन बचत झाल्यास एसटीला तोट्याच्या गर्तेतून काढणे सहज शक्य होईल. राज्यातून अहेरी आगाराला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय अभियंता प्रमोद राऊत यांनी केले. प्रास्ताविक आगार प्रमुख राखडे, संचालन व आभार रोखपाल चरण सहारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष बोंडे, शंकर काळबांधे, पठाण, ढवस यांच्यासह आगारातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
बसचालकांना इंधन बचतीचे धडे
By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST