महिलांचा उदंड प्रतिसाद : कृषी विज्ञान केंद्रात जांभूळ फळ प्रक्रियेवर प्रशिक्षण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील महिलांनी गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात हजेरी लावून जांभळापासून विविध पदार्थ बनविण्याचे धडे घेतले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोलीच्या वतीने येथे बुधवारी जांभूळ फळ प्रक्रियेवर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ज्ञ (गृहविज्ञान), डॉ. योगीता सानप, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. शुभांगी अलेक्झांडर, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा चौधरी, प्रीती मेश्राम, वर्षा बट्टे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. योगीता सानप यांनी जांभळापासून रस, सिरप, लाडू, चॉकलेट, वड्या व इतर पदार्थ कसे झटपट बनविता येतात, याचे उपस्थित महिलांना प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सानप म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची भागातील जंगलातून अनेक व्यापारी जांभूळ फळे चंद्रपूर, नागपूर शहरासह छत्तीसगड राज्यात नेतात. जांभूळ फळे फार नाजूक असल्याने त्यांचा टिकण्याचा कालावधी कमी असतो. जांभूळ फळावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास मूल्यवर्धीत पदार्थाला जास्त वेळ टिकवून ठेवता येऊ शकते. तसेच जांभळापासून तयार केलेल्या पदार्थ्याचे मूल्यही वाढण्यास मदत होते. त्यामुळे महिलांनी जांभळापासून विविध पदार्थ बनवावे, असे आवाहन डॉ. सानप यांनी यावेळी केले. याप्रसंगी अनेक महिलांनी जांभळपासून विविध पदार्थ बनविण्याची कृती डॉ. सानप यांच्याकडून अवगत करून घेतली. तसेच आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेष तज्ज्ञ डॉ. व्ही. एस. कदम, अनिल तारू, दीपक चव्हाण, ज्योती परसुटकर, हितेश राठोड, गजेंद्र मानकर, प्रवीण नामूर्ते, नेशन टेकाम, जितेंद्र कस्तुरे तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी कृषी विज्ञान महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
जांभळापासून विविध पदार्थ बनविण्याचे घेतले धडे
By admin | Updated: June 29, 2017 02:07 IST