माेकाट कुत्र्यांच्या मागावर आलेल्या बिबट्याला घरात केले बंदिस्त
By गेापाल लाजुरकर | Published: August 20, 2023 07:00 PM2023-08-20T19:00:12+5:302023-08-20T19:00:22+5:30
दवंडी गावातील थरार : दुपारी वन विभागाने केले जेरबंद
गडचिराेली : मध्यरात्री माेकाट कुत्र्यांचा पाठलाग करत गावात आलेला बिबट्या थेट एका घरात शिरला. आपल्या घरात बिबट्या शिरल्याची कुणकुण लागताच कुटुंब घराबाहेर पडले व त्या बिबट्याला घरातच बंदिस्त करून ठेवले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास धानाेरा तालुक्यातील दवंडी गावात घडली. दुसऱ्या दिवशी दुपारी बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले.
दवंडी येथील हिरामण कुमरे हे आपल्या कुटुंबासह घरी झोपले असताना माेकाट कुत्र्यांचा पाठलाग करीत बिबट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. बिबट्या घरात शिरल्याची चाहूल लागताच कुटुंबीय घाबरले; परंतु वेळीच प्रसंगावधान राखून सर्व सदस्य घराबाहेर पडले. त्यानंतर बाहेरून घराचा दरवाजा बंद करीत बिबट्याला घरातच बंदिस्त केले.
वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आरटी पथकासह शनिवारी सकाळी ७ वाजता दवंडी गावात दाखल झाले. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला दुपारी जेरबंद करण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज ढेंबरे, उत्तर धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. केलवटकर, वनपाल संजय रामगुंडेवार, यांच्यासह आरआरटी पथकातील अजय कुकडकर, पंकज फरकाडे, मकसूद सय्यद, कुणाल निमगडे, गुणवंत बावनवाडे, निखिल बारसागडे यांनी केली.
संपूर्ण रात्र जागून काढली
घरात बिबट्या शिरल्यानंतर कुमरे कुटुंबीयांनी शेजारच्या लाेकांना कळवून बिबट्याच्या भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. बिबट्या काेणत्याही स्थितीत बाहेर पडू नये व ताे दुसऱ्याला धाेका पोहोचवू नये यासाठी गावकरी सुद्धा रात्रभर प्रयत्नशील राहिले.