चामोर्शी : तालुक्यातील भेंडाळा येथील ग्रामपंचायत सभागृहात नेहरू युवा केंद्र गडचिरोली व एकसंघ युवा मंडळ सगणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवा नेतृत्व प्रशिक्षण व सामुदायिक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक जमूना डगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य प्रमोद भगत, भेंडाळाचे सरपंच लालाजी उंदिरवाडे, प्रा. किशोर ओल्लालवार, अभिषेक मिश्रा, ए. ए. येनगंटीवार, भरत घेर, रविंद्र चुनारकर, दिवाकर सहारे, उराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जमूना डगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे फार महत्वाचे आहे. नेतृत्वगुण एखाद्या युवकात जन्मजातच असला तरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून इतरही युवकांमध्ये नेतृत्वगुणाचा विकास करता येतो. समाजकारण, राजकारण यासारख्या क्षेत्रामध्ये नेतृत्वगुणाची फार मोठी आवश्यकता आहे. त्याचबरोबर मोठ- मोठ्या खासगी कंपन्यांमध्येही या गुणाची विशेष कदर केली जाते. नेतृत्वगुण असलेला विद्यार्थी स्वत:बरोबरच इतरांनाही न्याय मिळवून देऊ शकतो. पं. स. सदस्य प्रमोद भगत म्हणाले की, नवीन तंत्रज्ञानाबरोबरच युवकांमध्ये नवीन कौशल्य विकसीत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. एकाबाजूला बेरोजगारी झपाट्याने वाढत असल्याची ओरड आहे तर दुसऱ्या बाजूला लायक कर्मचारी मिळत नसल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात येत आहे. जे तंत्रज्ञान कंपन्यांनी स्वीकारले आहे. ते तंत्रज्ञान अवगत असलेले प्रशिक्षित युवक नसल्याने ही विरोधाभासाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नरेश घेर, प्रास्ताविक रविंद्र चुनाकर तर आभार भरत घेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीष धोटे, क्रिष्णा लाबाडे, नरेश सोमनकर, अल्का उरकुडे, भारती वासेकर, नुतन सातपूते, प्राची काटवले, प्रणाली पाल, अमोल पोरटे, अजय मिटपल्लीवार, सुनिल आभारे, संदीप झाडे आदींनी सहकार्य केले. अशा प्रकारचे प्रशिक्षण जिल्हाभरात राबविल्यास युवकांना स्वयंरोजगारासाठी चालना मिळेल असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. (शहर प्रतिनिधी)
युवकांना नेतृत्वगुणाचे धडे
By admin | Updated: August 7, 2014 23:58 IST