एकमेव विहिरीची प्रचंड दुरवस्था : भीषण पाणी टंचाईने नागरिक त्रस्त; प्रशासनाचा कानाडोळाअहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम आदिवासी बहूल लंकाचेन गावात एकच विहीर असून सदर विहिरीची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. या विहिरीच्या पाण्याची पातळी खालावल्याने या गावातील नागरिक गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याच्या पाण्यावर आपली तहान भागवित असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे.देवलमारी-व्यंकटापूर मार्गावर असलेल्या आवलमारी ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या लंकाचेन गावात ८० घरांची लोकवस्ती असून या गावाची लोकसंख्या जवळपास ३५० ते ४०० आहे. या गावात आदिवासी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करीत आहेत. लंकाचेन गावात जिल्हा निर्मितीपासून एकच विहीर आहे. मात्र या विहिरींची भिंत पूर्णपणे जीर्ण झाली असून सदर विहीर कोसळण्याच्या मार्गावर आहे. परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या गावालगत प्राणहिता नदी व नाला आहे. मात्र शासन व प्रशासनाने या गावात अद्यापही नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना दरवर्षी उन्हाळ्यात गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याचे पाणी सायकल व बैलबंडीद्वारे न्यावे लागते. मे महिन्यात प्रखर उन्हाळा असतो. यावेळी या गावातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. जिल्हा प्रशासनाने या गावात पाणी पुरवठा व रस्त्याची सुविधा निर्माण करावी, अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
लंकाचेनवासीयांची तहान भागते नाल्याच्या पाण्यावर
By admin | Updated: March 7, 2016 00:57 IST