नुकसानग्रस्तांना दिलासा : वीज पडून मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपये दिलेगडचिरोली : १ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे एकूण ६९६ घरांची पडझड झाली होती. तसेच ३९ गोठ्यांची पडझड झाली होती. तर अतिवृष्टीमुळे वीज पडून पाच जण तर पुरामुळे दोघेजण दगावले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या जिल्हाभरातील घटनांचा महसूल कर्मचाऱ्यांच्यावतीने पंचनामा व सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने आपतग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला लाखो रूपयाचा निधी प्रदान केला. जिल्हा प्रशासनाने वीज पडून ठार झालेल्या पाच व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रूपये वितरित केले. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रूपये प्रमाणे प्रशासनाने आर्थिक मदत दिली असल्याची माहिती आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील ६६ जनावरे दगाविली होती. पावसाच्या महाप्रलयामुळे घरांची पडझड व जनावरांची मिळून एकूण १५ लाख ११ हजार रूपयाचे नुकसान झाले होते. जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत भामरागड, सिरोंचा तालुक्यातील मुसळधार पावसाने कहर केला होता. या तालुक्यातील जनजीवन अधिकच विस्कळीत झाले होते. अतिवृष्टीमुळे आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण २४ जनावरे दगावली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे ३० जनावरे दगावली होती. या दोन्ही महिन्याचे मिळून एकूण २ लाख ५४ हजार ९९० रूपयाचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली होती. अखेर शासनाने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाला प्रथम टप्प्यात ५७ लाख रूपयाचा निधी प्रदान केला. निधी मिळताच जिल्हा प्रशासनाने एटापल्ली, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व अन्य तालुक्यातील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
आपदग्रस्तांना शासनाकडून लाखांची मदत
By admin | Updated: October 6, 2014 23:11 IST