गडचिराेली : माेकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले असले तरी गडचिराेली नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे माेकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या कळपामुळे गडचिराेलीवासीय त्रस्त आहेत.
गडचिराेली शहरात माेकाट जनावरे, कुत्रे व डुकरांची समस्या अतिशय गंभीर आहे. गडचिराेली नगर परिषदेमार्फत अधूनमधून डुकरे पकडण्याची माेहीम राबविली जाते. तरीही डुकरांची संख्या वाढतच आहे. डुकरांच्या समस्येने ग्रस्त नसलेला एकही वाॅर्ड नाही. डुकरांबराेबरच कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यांमुळे अनेकांची झाेपमाेड हाेत आहे. कुत्र्यांची संख्या वाढत असल्यास त्यांची नसबंदी करण्याचे अधिकार नगर परिषदेला दिले आहेत. मात्र, गडचिराेली नगर परिषदेच्या इतिहासात एकदाही नसबंदीची प्रक्रिया राबविली नाही. परिणामी माेकाट कुत्रे वाढत चालले आहेत.
कुत्र्यांचे नागरिकांवर हल्ले हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादा दिवस जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, नागरिक याबाबत नगर परिषदेकडे तक्रार करीत नसल्याने शहरात माेकाट कुत्र्यांची समस्या नाही, असा समज नगर परिषदेचा आहे. नगरसेवकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.