कुरखेडा : कोरची-कुरखेडा मार्गावरील पुराडा येथे पाळत ठेवत कुरखेडा पोलिसांनी चारचाकी वाहनासह ४ लाख ५० हजार रूपयांची दारू बुधवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातून कोरची मार्गे कुरखेडा तालुक्यात दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती कुरखेडा पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस उपनितीक्षक पंकज महाजन यांनी पोलीस पथकासह पुराडा येथे पाळत ठेवली. कोरची एमएच ३५ पी १५३७ या कारला हात दाखवून वाहन थांबविले. या वाहनाची चौकशी केली असता, वाहनात जवळपास पाच विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. या प्रकरणी हेमंत पद्माकर (३१), राकेश नने (२९), रा. भोजराज अरखेल (३०), रपेश तिवारी (१८) सर्व रा. गोंदिया या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. हेमंत पद्माकर याच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्यात दारू पुरविली जात होती. पोलिसांनी त्याला अटक केल्याने कुरखेडा तालुक्यातील दारूची रसद कमी होण्यास फार मोठी मदत झाली आहे. कुरखेडा तालुक्यातील दारूविक्रेत्यांना दारू पुरविणारा हा मुख्य डिलर मानला जातो. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
कुरखेडा पोलिसांनी जप्त केली दारू
By admin | Updated: January 29, 2015 23:06 IST