चामाेर्शी तालुक्यात कुनघाडा रै. हे गाव लोकसंख्या व विस्ताराने बरेच मोठे असून राजकीयदृष्ट्याही महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळखले जाते. कुनघाडा रै. गावात शिक्षण, आरोग्य व इतर सुविधा प्राथमिक स्वरूपात असल्या तरी बऱ्याच सुविधा अद्यापही उपलब्ध झाल्या नाहीत. आरोग्याची समस्या लक्षात घेऊन कुनघाडा रै. येथे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर आरोग्य केंद्रांतर्गत प्राथमिक आरोग्य पथक पाविमुरंडा, आयुर्वेदिक दवाखाना तळोधी, आयुर्वेदिक दवाखाना गिलगाव जमी., उपकेंद्र कुथेगाव, नवरगाव, नवेगाव रै. माल्लेर माल, भाडभिडी मो., मुरमुरी, येडानूर आदी ११ उपकेंद्रांचा समावेश असून ४२ गावे समाविष्ट आहेत. सर्व उपकेंद्रांचे केंद्रबिंदू असलेल्या कुनघाडा रै. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार हाेताे. मागील वर्षीपासून कोरोना व्हायरसने कहर केला असल्याने रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णाचा इतरांशी संसर्ग होऊ नये म्हणून अशा रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर नसल्यामुळे तालुका व जिल्हा मुख्यालयात हलवावे लागत आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयात याेग्य व्यवस्था नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना त्रास होताे. त्यामुळे कुनघाडा रै. येथे कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष पंकज खोबे यांनी केली आहे.
कुनघाडा रै. येथे काेविड सेंटर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST