चौकशी करा : जि.प., पं.स. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत मुडझा बु. येथे ग्राम पंचायतीच्या वतीने अंदाजपत्रकाविना तसेच ग्रामसभेची मंजुरी न घेता जुन्या कोंडवाड्याच्या दुरूस्तीचे तसेच जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाडीत नव्या शौचालयाचे काम करण्यात आले. २६ जून रोजी सोमवारला कोंडवाड्याचे छत कोसळले. त्यामुळे या कामाचा दर्जा निकृष्ट आहे, असा आरोप करीत ग्रा. पं. च्या या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जि. प., पं. स. पदाधिकाऱ्यांसह मुडझा बु. येथील नागरिकांनी गडचिरोली येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला गडचिरोली पं. स. च्या सभापती दुर्लभा बांबोळे, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, मुडझाचे तंमुस अध्यक्ष प्रमोद उमरगुंडावार, उपाध्यक्ष श्रीहरी चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुळशिराम दाणे, किशोर सोेनुले, प्रणय गंदेवार, राहुल येमुलवार, उमाजी राऊत, अविनाश येमुलवार, सोनू गड्डमवार, सोनू चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांनी सांगितले की, मुडझा ग्राम पंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून दोन लाख रूपयाच्या निधीतून जुन्या कोंडवाडा दुरूस्तीचे नियोजन केले. सदर कामाचे कंत्राट मनीष कोतपल्लीवार यांना दिले. त्यांनी मे महिन्याच्या सुरुवातीस कोंडवाडा दुरूस्तीचे काही काम केले. त्यानंतर कामाला पूर्णविराम दिला. पावसाळा सुरू होताच २५ जून रोजी कोंडवाडा दुरूस्तीचे काम करून त्यावर कवेलूचे छत टाकले. मात्र दुसऱ्याच दिवशी २६ जूनला झालेल्या पावसाने कोंडवाड्याचे छत कोसळले. त्यामुळे या कामाचा दर्जा सुमार आहे, असा आरोप या सर्वांनी केला. विशेष म्हणजे कोंडवाडा दुरूस्तीच्या कामासाठी ग्रामसभेची मंजुरी घेतली नाही. त्याचे अंदाजपत्रकही तयार केले नाही. ते मागितले असता, सरपंच व ग्रामसचिवांनी आम्हाला दिले नाही. त्यामुळे या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रा. पं. च्या कारभाराची तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अंदाजपत्रकाविना कोंडवाडा दुरूस्ती व शौचालयाचे काम
By admin | Updated: June 29, 2017 02:08 IST