कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयी-सुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सौर बॅटऱ्या गायब
आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.
एलईडी बल्ब पुरविण्याची मागणी
धानोरा : दोन वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यात वीज विभागामार्फत एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात आला होता. चार ते पाच हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. एलईडी बल्ब खरेदी केले.
बायोमेट्रिक मशीन बंद, कर्मचारी बिनधास्त
कोरची : शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.
गोकुलनगरात पोलीस चौकीची मागणी
गडचिरोली : स्थानिक गोकुलनगरात चोरी व गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी निर्माण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीही नगरात वाढली आहे.
कुंपणाअभावी नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी.
कोरचीत डास वाढले
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. स्थानिक प्रशासनाने फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सुकन्या योजना अनभिज्ञ
आष्टी : सुकन्या योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. ग्रामीण भागात या योजनेची जनजागृती होणे गरजेचे आहे. शासनाने ग्रामीणसह दुर्गम भागात या याेजनेची जागृती करावी, अशी मागणी हाेत आहे.
तंमुसला प्रशिक्षण द्या
गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नयेत, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोनसरीत कव्हरेज गुल
कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाइन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन कामे करताना अडचणी येत आहेत.
झुडपी जंगल शेतीला द्या
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
निराधारांचे अनुदान वाढवा
कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.
बाेगस देयके वाढली
गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार बाेगस बिल ग्राहकांना देत आहेत.
रानवाही मार्ग खड्ड्यात
धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.
अनेक भूखंड रिकामे
गडचिरोली : गडचिरोली शहराजवळची शेकडो एकर जागा एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यासारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र बहुतांश भूखंड रिकामेच आहेत. उद्याेग उभारल्यास बेराेजगारांना राेजगार मिळू शकताे.