चार महिने उलटले : प्रभारी तलाठ्यावरच सुरू आहे कारभारकमलापूर : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा महसूल मंडळांतर्गत कमलापूर येथे तलाठी साजा क्रमांक १७ चे कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात चार महिने उलटूनही स्वतंत्र नियमित तलाठ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे प्रभारी तलाठ्याच्या भरवशावर या तलाठी कार्यालयाचा कारभार सुरू आहे. परिणामी वेळेवर दाखले मिळत नसल्याने कमलापूर परिसरातील शेतकरी व विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. चार महिन्यांपूर्वी कमलापूर येथील तलाठी सेवानिवृत्त झाले, तेव्हापासून येथे स्वतंत्र व नियमित तलाठी देण्यात आला नाही. तलाठी दखणे यांच्याकडे कमलापूर साजाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कमलापूर तलाठी साजा अंतर्गत १२ ते १५ गावांचा समावेश आहे. मात्र प्रभारी तलाठी बऱ्याच कार्यालयात मिळत नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना परत जावे लागते. सातबारा व दाखले वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना महसूल व कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. कमलापूर सारख्या दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याकडे प्रशासनासह शासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
स्वतंत्र तलाठ्याअभावी त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2016 01:46 IST