लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मूल मार्गालगतच्या रेव्हुनी काॅलनी, काेर्ट काॅलनी व महिला महाविद्यालयाच्या परिसरात वीज खांब गाडून वायर टाकण्यात आले. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून वीज जाेडणी करून पथदिवे सुरू करण्यात आले नाही. परिणामी रात्रीच्या सुमारास या परिसरात अंधाराचे साम्राज्य राहते.
सायंकाळी जेवणानंतर व पहाटेच्या सुमारास रेव्हुनी काॅलनी व महिला महाविद्यालय परिसरातील नागरिक फिरण्यासाठी बाहेर निघतात. दरम्यान, या भागात पथदिवे सुरू राहत नसल्याने मार्गावर अंधार राहताे. खूप वर्षांपासूनची जुनी वस्ती असूनसुद्धा अनेक ठिकाणी अंतर्गत मार्गावर पथदिव्यांचा अभाव हाेता. ही समस्या वाॅर्डातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे मांडली. त्यानंतर पालिकेच्या वतीने खांब गाडणे, वीज जाेडणी करून पथदिवे सुरू करणे आदी कामे मंजूर करण्यात आली. बऱ्याच प्रतीक्षेनंतर वीज खांब गाडण्यात आले. त्यावर वायर टाकण्यात आले. मात्र पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष वीज जाेडणी केली नाही. दिवेसुद्धा लावले नाही. त्यामुळे घराच्या सभाेवताल अंधाराचे साम्राज्य दिसते. नगरपालिका प्रशासनाचे या भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष हाेत असल्याचा आराेप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.