सदर आग ही मानवनिर्मित असून, ती अज्ञात इसमाने लावलेली असल्याचा संशय संबंधित विभागाला आहे. आग लागण्यामागे कुणाचा हात आहे व आग लावण्याचा हेतू काय? याचा शोध संबंधित विभागाने अद्याप घेतला नाही. त्यामुळे जळीत प्रकरणातील आरोपीचा सुगावा अजून लागलेला नाही. वन विभाग व नगर परिषद प्रशासनाने याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही. १५ दिवसांचा कालावधी लोटूनही जळीत प्रकरणामागील रहस्य उलगडलेले नाही.
वडसा रोडलगतच्या या जैवविविधता उद्यानात चार- पाच वर्षांपूर्वी विविध जातींची दुर्मीळ वनौषधींची झाडे, बांबू, फळे व फुलांची झाडे आणि बगिचा लावण्यात आला होता. हे उद्यान तयार करताना शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अलीकडच्या काळात सदर उद्यानाचे काम रखडले होते, उद्यानाची देखभाल करणे गरजेचे होते; परंतु आरमोरी वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. चौकीदार ठेवले असते, तर उद्यानाला आग लावण्याची हिंमत कुणी केली नसती आणि शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले नसते. मौल्यवान वनसंपदाही जळून खाक झाली नसती; परंतु सदर बाबीकडे अधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही.
आरमोरी- वडसा रस्त्यालगत जैवविविधता उद्यानाच्या जवळ नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र आहे. याही केंद्राला एकाच वेळी आग लावण्यात आली. यामध्ये तेथील प्लास्टिकचा कचरा जळून खाक झाला. सदर कचरा डेपोत ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण झाले होते. तिथे पाण्याची व्यवस्था होती काय? तिथे कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा प्रकल्प असल्याने कुणी चौकीदार होते का, आदी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जैवविविधता उद्यान व घनकचरा डेपोला आग लागल्याच्या घटनेला १५ दिवसांचा कालावधी होत आहे. मात्र, आग लावणारा अज्ञात इसम अद्यापही सापडला नाही. सदर जळीत प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोन्ही घटनांतील आरोपींचा शोध लावण्यात यावा व याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजली नाही.
घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील जळीत प्रकरणाचा पंचनामा केल्यावर तक्रार देण्यासाठी आमचा कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली नाही. त्यामुळे प्रकरण थांबले.
-नितीन गौरखेडे,
अभियंता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग नगर परिषद, आरमोरी