आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्थानकामध्ये कार्यरत पोलीस शिपाई गजानन ठाकूर (३६) हे अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर नागपूर येथील दवाखान्यात उपचार सुरु होते. परंतु, बुधवारी रात्री १०.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
१३ एप्रिलच्या मध्यरात्री नाकाबंदीसाठी आष्टी येथील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना पोलीस शिपाई ठाकूर यांना गोंडपिपरीकडून येणाऱ्या मिनी ट्रकने जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना लगेच चंद्रपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना नागपूर येथील दवाखान्यात नेण्यात आले. याठिकाणी नऊ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पोलीस शिपायाचा अखेर मृत्यू झाल्याचे कळताच आष्टी पोलीस स्थानकात शोककळा पसरली. ठाकूर हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.