याबाबत महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणेचे गडचिरोली प्रतिनिधींनी पणन संचालकांना जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था गडचिरोली यांच्यामार्फत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल, स्वच्छता कर्मचारी आदींना कोविडयोध्दा घोषित करून कोरोनाची लागण झाल्यास ५० लाखाचे विमा संरक्षण तसेच त्यांना वैद्यकीय सेवा व इतर सुविधा लागू करण्यात आल्या आहे, त्याच धर्तीवर अत्यावश्यक सेवेत काम करणारे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हे संरक्षण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे . सध्या जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा याकरिता बाजार समित्या सुरू ठेवाव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी, सर्व बाजार समितीचे सभापती, महाराष्ट्र राज्य बाजार समिती बाजार समिती संघाचे अध्यक्ष, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ अध्यक्ष यांनाही कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे. जिल्ह्यात बाजार समितीत हंगामी व रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच बाजार समितीत काम करीत असताना व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असताना काही कर्मचारी कोरोना रोगाने ग्रस्त असून, उपचार सुरू आहे. आरमोरी व चामोर्शी बाजार समितीमधील कर्मचाऱ्याचा मुत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुंटुंबीयांना मोठा आघात झालेला आहे. त्यामुळे विमा संरक्षण लागू करावे, अशी मागणी केली आहे.
बाजार समिती कर्मचाऱ्यांना कोविडयोध्दा घोषित करून विमा संरक्षण लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST