विकासाची ग्वाही : देवेंद्रफडणवीस यांची राज्य सरकारवर टीकाअहेरी : विदर्भात नद्या, नाले, जंगल मोठ्या प्रमाणात आहे. मात्र राज्य सरकारने विदर्भाच्या सिंचन सुविधेकडे दुर्लक्ष केले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.भारतीय जनता पार्टी व नाग विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने रविवारी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडियमच्या प्रांगणात विजय संकल्प महामेळावा पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर मार्गदर्शक म्हणून भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, नाविसचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव महाराज, भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, बाबुराव कोहळे, महिला जिल्हाध्यक्ष शालू दंडवते, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, चिलय्याजी मद्दीवार, गंगाराम कोडापे, नाविसचे युवा नेते अवधेशबाबा, प्रकाश गुडेल्लीवार, डॉ. शंकरराव मदीवार, प्राचार्य अरूण लोखंडे, सत्यनारायण मंचार्लावार, दामोधर अरगेला, अब्बास बेग, जि.प. सदस्य मंदा दुर्गे, बोड्डामी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी राज्य सरकारने विदर्भाचे जंगल दाखवून विदर्भाच्या बाहेर सिंचनाची सोय केली. यामुळे विदर्भ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. दुष्काळामुळे राज्यात सर्वाधिक विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आघाडी सरकारला सत्ता भोगून १५ वर्ष झाले आहेत. मात्र या १५ वर्षात गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच आघाडी सरकारला धडा शिकविणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी खासदार हंसराज अहीर, अशोक नेते यांच्यासह मंचावरील नेत्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन क्रिष्णा मंचालवार यांनी केले. तर आभार जि.प. सदस्य सूवर्णा खरवडे यांनी मानले. कार्यक्रमाला भाजप व नाविसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह जवळपास १० हजार नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विदर्भाच्या सिंचनाकडे दुर्लक्ष
By admin | Updated: August 31, 2014 23:48 IST