शेतकरी चिंतेत : वडधा परिसरातील धानपीक धोक्यातआरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरात लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्यात आला आहे. सदर बंधारा मागील चार वर्षांपासून फुटून आहे. त्यामुळे पाणी साचत नसल्याने हा बंधारा निरूपयोगी ठरला आहे. वडधा परिसरात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाची सुविधा नसल्याने धानपीक एका पाण्याने करपत होते. शेतीच्या जवळून वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधल्यास नाल्यामध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करता येईल, या उद्देशाने सिंचन विभागाने वडधा शेतशिवारात नरेश खेवले यांच्या शेताजवळ बंधारा बांधला. मात्र सदर बंधारा एका बाजुने फुटला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी साचून राहत नाही. या बंधाऱ्याच्या माध्यमातून ४० एकर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असती. मात्र बंधारा फुटला असल्याने या ठिकाणी पाणीच साचून राहत नाही. सदर बंधारा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा सिंचन विभागाकडे केली आहे. मात्र अजूनपर्यंत सिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरूस्ती केली नाही. यासाठी किरकोळ खर्च लागणार आहे. तरीही सिंचाई विभागाने बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लाखो रूपयांचा खर्च होऊनही बंधारा निकामी झाला आहे. या बंधाऱ्यामध्ये पाणी साचले तर रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शक्य झाले असते. अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ शकले असते. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून सदर बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. किमान पुढील वर्षीतरी याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होईल. (शहर प्रतिनिधी)
फुटलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 02:16 IST