वैरागड : गावाच्या दक्षिणेला खोब्रागडी, वैलोचना आणि नाडवाही नदीच्या त्रिवेणी संगमाजवळ वैरागड धानोरा या मुख्य मार्गालगत एका उंच टेकडीवर असलेल्या भंडारेश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी मागील वर्षभरापासून टेकडीचे खोदकाम करून ठेवले आहे. बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य देखील त्या ठिकाणी पडून असतांना अजून बांधकामाला सुरूवात झाली नाही. याबाबत जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या पण लोकप्रतिनिधींच्या आदेशाला केराची टोपली मिळाली आहे. वैरागड येथील ऐतिहासिक किल्ला व भंडारेश्वराचे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येते. या वास्तूच्या देखभालीची जबाबदारीदेखील संबंधित विभागाची आहे. वर्षापूर्वी मंदिराच्या मागच्या भागातील पायऱ्याचे बांधकाम झाले. मंदिरापासून नदीपात्रापर्यंत झालेल्या पायऱ्यांच्या बांधकामामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना सोयीचे झाले आहे. टेकडीच्या पायऱ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच पायऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी मंदिराच्या दर्शनी भागात टेकडीचे खोदकाम करून एका वर्षाचा कालावधी झाला आणि बांधकामासाठी आवश्यक असलेले साहित्य देखील उपलब्ध असतानादेखील मागील वर्षभरापासून टेकडीच्या सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. भंडारेश्वर मंदिराचे थांबलेले सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात यावे. यासाठी येथील भंडारेश्वर देवस्थान समितीचे पदाधिकारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मदतीने पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि मंदिराच्या सौंदर्यीकरणांच्या अडचणी बाबतची सविस्तर माहिती दिली. वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम आठ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्या होत्या. मात्र या बाबीला तीन ते चार महिन्याचा कालावधी लोटला असूनही टेकडीवरील बांधकामाची सुरूवात करण्यात आली नाही. भंडारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची यात्रा भरते. २७ फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा सण असल्याने भंडारेश्वराचे सौंदर्यीकरण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. सदर काम रखडले असल्याने भाविकांनाही त्रास होत आहे. (वार्ताहर)
भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष
By admin | Updated: October 26, 2014 22:39 IST