लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एखादा आराेग्य कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह आल्यास संबंधित कर्मचाऱ्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंत व त्यानंतरचे सात दिवस तसेच घरी आयसाेलेशन असलेल्या कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त १४ दिवसांची भरपगारी रजा मंजूर कराव्या, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक राष्ट्रीय नागरी आराेग्य अभियानचे अतिरिक्त अभियान संचालक डाॅ. सतीश पवार यांनी २४ मार्च राेजी निर्गमित केले आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २३ मार्च २०२० राेजी लाॅकडाऊन घाेषित करण्यात आले. लाॅकडाऊनमुळे काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहू शकले नाही, तर काही कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह असल्यामुळे किंवा काेराेना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहू शकले नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना किती दिवसांची रजा मंजूर करावी, अशी विचारणा जिल्हा स्तरावरून केली जात हाेती. यावरून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लाॅकडाऊन कालावधीत ज्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीनुसार घरून काम केले आहे. व जे वरिष्ठांनी प्रमाणित केले आहेत, त्या कालावधीचे वेतन अशा कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावे. जुलै महिन्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आली हाेती. त्यामुळे काेणत्याही कर्मचाऱ्यास ३१ जुलै २०२० नंतर घरून काम करण्याचे वेतन देऊ नये.वरिष्ठस्तरावरून मार्गदर्शकसूचना प्राप्त न झाल्याने अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांचे काेराेना पाॅझिटीव्ह कालावधीतील वेतन, मानधन थांबवून ठेवण्यात आले हाेते. २४ मार्च राेजी परिपत्रक निर्गमित करून सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असल्याने वेतनाचा मार्ग माेकळा झाला आहे. काेराेना पाॅझिटीव्ह कालावधीच्या सुट्या मंजूर हाेण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना हाेती, ती पूर्ण झाली.
हाय रिस्कसाठी कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची गरजजे कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने हायरिस्क म्हणून वर्गीकरण करण्यात आले हाेते, त्यांनी त्यावेळी आवश्यक प्रमाणपत्रे सदर केली असल्यास व त्यांनी घरून कार्यालयाचे काम केले असल्यास अशा कर्मचाऱ्यांना कमाल १० दिवसांची भरपगारी रजा मंजूर करावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. थकलेले वेतन मिळण्याचा मार्ग माेकळा झाला.