गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतीची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. सदर कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोकळे भूखंड दुर्लक्षित
अहेरी : शहरात बहुतांश ठिकाणी शासकीय मोकळे भूखंड आहेत. त्यामुळे या भूखंडांवर बगीचा, क्रीडांगण साकारून शहराच्या सुंदरतेत आणखी भर टाकावी, अशी मागणी करण्यात आली असून निवेदनही देण्यात आले आहे.
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
आरमाेरी : शासकीय कार्यालयात काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयातील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
गडचिराेली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पूर आल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारत आहेत.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
अत्यल्प बससेवेमुळे प्रवासी त्रस्त
चामाेर्शी : मूल मार्गावर अत्यल्प बस फेऱ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर बससेवा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
देसाईगंज : जिल्ह्यातील काही गावांत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीएसएनएलमधील रिक्त पदे तात्काळ भरा
गडचिराेली : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रांतील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत,अशी मागणी केली जात आहे.
पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
धानाेरा : तालुक्यातील अनेक गावांतील जलकुंभ शोभेच्या वास्तू ठरल्या. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाहीत. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर होत आहे.
मोकाट जनावरांचा चौकाचौकात ठिय्या
आष्टी : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे
कुरखेडा : जंगल परिसरात असणारे ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करतात; पण वनकायद्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर लावण्याची आवश्यकता आहे. विसापूर भागातही नाली स्वच्छतेचे काम करण्याची आवश्यक आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाहीत
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
वाहनांच्या गतीला आवर घाला
सिरोंचा : येथील प्रमुख मार्गांवर भरधाव वाहनांमुळे पहाटेच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे वळण मार्गावर गतिरोधक लावून वाहनांच्या गतीला आवर घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रांगी गावालगत गतिरोधक उभारा
रांगी : येथील बसथांब्यापासून मोहलीकडे जाणाऱ्या मार्गावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने जातात. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आरमोरी मार्गावरील पथदिवे बंद
गडचिरोली : आरमोरी मार्गावरील अनेक पथदिवे बंद पडले आहेत. हे पथदिवे सुरू करणे आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. आरमोरी मार्गावर अनेक नागरिक पहाटे व रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी जातात. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे दुरुस्त करणे आवश्यक आहे. याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अहेरी आगाराला नव्या बसगाड्या द्या
अहेरी : अहेरी हे राज्यातील सर्वांत जुने एसटी आगार आहे. येथून लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या जातात. मात्र, बहुतांश गाड्या जुनाट आहेत. त्यामुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत. येथून आंतरराज्यीय बससेवाही चालविली जाते. गडचिरोली व अहेरी आगाराला नव्या मोजक्या बसगाड्या काही महिन्यांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या; मात्र त्या अपुऱ्या आहेत. बसगाड्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे.