सावकारांच्या विरोधात : शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता करा कुरखेडा : सावकारांच्या ताब्यात असलेले शेतकऱ्यांचे गहाण म्हणून ठेवलेले सोने परत करा, कच्च्या पावत्यावर व्यवहार करणाऱ्या सावकाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तालुक्यातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी शनिवारी कुरखेडाच्या तहसील कार्यालयावर धडक दिली. शासनाने सततची दुष्काळ व नापिकीची परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी सावकाराकडून शेतकऱ्यांनी घेतलेले खासगी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य सावकार तारण कर्जाचा व्यवहार कच्च्या पावत्यावर करीत असल्याने अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळाला नाही. सावकार व शेतकऱ्यांमध्ये सोने तारण व्यवहार कच्च्या पावतीवर होत असल्याने अनेक शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे कच्च्या पावत्यावर व्यवहार करणाऱ्या सावकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्याच्या पावतीवर सावकाराकडे तारण असलेले शेतकऱ्यांचे सोने शेतकऱ्यांना परत करण्यात यावे या मागणीसाठी संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी कुरखेडाच्या गांधी चौकातील मोर्चा काढला व त्यानंतर तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी नायब तहसीलदार गुंफावार व सहायक निबंधक चौहाण यांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्याशी चर्चा केली. या मोर्चाचे नेतृत्व सावकार ग्रस्त शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कवरके, उपाध्यक्ष प्रल्हाद धोंडणे, सरपंच शिवाजी राऊत, धर्मा दुरवडे, उत्तम कीर्तिनिया यांनी केले. या आंदोलनात हेमंत कवरके, रामचंद्र टेकाम, देवनाथ नैताम, मुरलीधर जोगे, लता सहारे, संतोष खोब्रागडे, ताज कुरेशी, लीलाधर भरणे, नामदेव लोहंबरे, पुंडलिक दादगाये, दिवाकर मारगाये, इंदूबाई नैताम, योगेश नाटके, अमित पाकमोडे, येनीदास कवरके, मनू नेवारे, गुरूदेव चांभारे, सुधाकर सुखारे, पुंडलिक गावतुरे, सुभाष जेन्टे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेकडो शेतकरी तहसीलवर धडकले
By admin | Updated: February 21, 2016 00:44 IST