कुरखेडा : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत नागरिकांना एका छत्राखाली येऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुरखेडा येथे ९ डिसेंबर रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना शेकडो दाखल्यांचे वाटप करण्यात आले. समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानी कुरखेडाचे उपविभागीय अधिकारी एम. एच. टोनगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार यू. एम. तोडसाम, पोलीस निरीक्षक पाटील, नायब तहसीलदार एस. के. वासनिक, के. आर. पातळ, मंडळ अधिकारी एम. जी. फुलकवर तसेच तालुक्यातील विविध विभागांचे प्रतिनिधी व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. समाधान शिबिरादरम्यान उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते सातबारा, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, कौटुंबिक शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २० हजार रूपयांचा धनादेश पाच लाभार्थ्यांना देण्यात आला. समाधान शिबिरात पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख विभागातर्फे माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी टोणगावकर यांनी नागरिकांच्या कल्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून शेकडो योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी व अर्ज करावे, असे आवाहन केले. तहसीलदारांनी विविध योजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्ही. एल. निमजे, डी. एन. जौंजाळकर, हेमंत अंबादे, तलाठी सोनकुसरे, यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. समाधान शिबिराला कुरखेडा तालुक्यातील शेकडो महिला, पुरूष, विद्यार्थी व इतर नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कुरखेडा येथील समाधान शिबिरात शेकडो दाखल्यांचे वाटप
By admin | Updated: December 10, 2014 22:58 IST