लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्याच्या कमलापूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या ताटीगुडम येथील एका खासगी विहिरीला गरम पाणी असल्याची बाब ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. सदर प्रकाराची चौकशी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आली असून, विहिरीच्या आतील भागात असलेल्या चुनखडकावर झालेल्या रासायनिक अभिक्रियांमुळे पाणी गरम झाल्याचा निष्कर्ष अभियंत्यांनी काढलेला आहे.
ताटीगुडम येथील सत्यन्ना मलय्या कटकू यांच्या खासगी विहिरीला गरम पाणी असल्याची बाब ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विहीर सुमारे २० वर्षे जुनी असून, तिचा व्यास १.३० मीटर व खोली ७.८० मीटर आहे. सहा महिन्यांपूर्वी या विहिरीतील गाळाचा उपसा करण्यात आला होता. त्यामुळे चुनखडकाचा थर लागलेला होता. तपासणीदरम्यान विहिरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले, तर सबमर्सिबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले. परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चुनखडक (चुनखडी कॅल्शिअम कार्बोनेट) खडक असल्याचे निष्पन्न झाले.
असा काढला निष्कर्ष...
ताटीगुडम येथील विहिरीतील गाळाचा उपसा सहा महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. त्यामुळे पाण्याचा संपर्क जमिनीखालील चुनखडकातील कॅल्शिअम ऑक्साइड सोबत आला. या खडकाची पाण्यासोबत उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (अॅक्झोथर्मिक रिअॅक्शन) होऊन कॅल्शिअम हायड्रॉक्साइड तयार झाले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी, विहिरीतील पाणी गरम झाले, असा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी म्हटले आहे.
"विहिरीचे पाणी, जवळील सार्वजनिक हातपंप व इतर - घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या निष्कर्षात गरम पाणी असलेल्या विहिरीच्या पाण्यात कॅल्शिअम कार्बोनेटची मात्रा तब्बल २२३ मि.ग्रॅ./ लिटर असल्याचे आढळले."- विनोद उद्धरवार, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प., गडचिरोली