गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे, याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोडही होते. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
कोरची तालुक्यातील शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहे. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्तच
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत. याकडे लक्ष देऊन दिवे पुन्हा सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
ग्रामीण भागातील गोदरीमुक्तीवर प्रश्नचिन्ह
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी, शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे.
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाही.
अल्पवयीन चालकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सिरोंचा तालुक्यातील बस थांब्याची दुरवस्था
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आली आहेत. मात्र, प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने, त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकारीने रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य आहे.
अहेरी शहरातील अतिक्रमण काढा
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
कुरखेडा : जि.प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आले असले, तरी ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नाही. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी येतात.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा(कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही दुर्गम भागातील अंगणवाड्यांचा रूप बदलणार आहे.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे. या समस्येकडे दुर्लक्ष हाेत आहे.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते असल्याचे दिसते.
अहेरी उपविभागातील पशुपालक झाले त्रस्त
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते कुणीही खरेदी करीत नाही.
कुटुंब कल्याण नियोजनाची गरज
मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज असल्याचे दिसते.
जळाऊ लाकडांची कमतरताच
कोरची : येथे विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात, परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाहीत. स्थानिक नागरिकांना वनविभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे दुर्लक्ष आहे.
आरोग्यसेविकाची पदे रिक्त
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी आरोग्यसेवा देण्याचे काम परिचारिका करते. मात्र, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिकांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात दरहजारी परिचारिकांचे प्रमाण ५.३१ टक्के आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे.
रस्त्याच्या बाजूची झाडे धोकादायक
गडचिरोली : जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या बाजूला झुडूप वाढलेली आहेत. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अनेक वेळा अपघात घडले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे झुडूप तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. चामोर्शी व आरमोरी मार्गावर काटेरी झुडपे वाढली आहेत.
शेकडो नागरिक अस्थमा आजाराने ग्रस्त
गडचिरोली : प्रदूषण, धुळीचे कण, धूम्रपान व आनुवंशिक कारणांमुळे उद्भवणारा अस्थमा आजार जीवघेणा ठरू शकतो. मागील एका वर्षांत सहा रुग्णांना या आजारामुळे प्राणास मुकावे लागले होते. दिवसेंदिवस अस्थमा रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.
जिल्हा परिषदेत दिव्यांगांची ससेहोलपट
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्यात यावी, असा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी मांडण्यात आला. मात्र, या प्रस्तावावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इमारतीत लिफ्ट बसविण्यात आली नाही. त्यामुळे वृद्ध व अपंग नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.
ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारावर आकोडा टाकून वीजचोरी केली जात आहे.