वन्यजीव प्रगणनेत माकडांचा समावेश असल्याने माकडांना इजा होईल, अशी कृती करणे हा गुन्हा ठरत असतो. काळ्या तोंडाची माकडे ही अत्यंत चपळ वन्यजीव असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जंगले ओस पडत असल्याने माकडांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला असून, घरासमोरील परसबाग व शेतातील लावलेल्या भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. फळझाडे, भाजीपालावर्गीय रोप माकडांच्या हैदोसामुळे नष्ट होत आहेत. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत माकडांना इजा होईल, अशी कृती करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, त्यांना लोकवस्तीकडे येऊ देऊ नये, अशी मागणी होत आहे. माकडांच्या हैदोसामुळे महिला, तसेच लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात रानडुकरांचाही हैदोस असून, पिकांचे नुकसान होत आहे.
माकडांचा हैदोस; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST