आरमोरी : संजय गांधी निराधार योजना निवड समितीचे अध्यक्ष आनंदराव आकरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० जून रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुमारे ३०० लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले असूून त्यांना शासनातर्फे अनुदान मिळणार आहे. राज्यातील निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, परितक्त्या, देवदासी महिला व अनाथ बालके आदींना चांगले जीवन जगता यावे, यासाठी शासनातर्फे महिन्याकाठी आर्थिक मदत दिली जाते. या लाभार्थ्यांची निवड तालुकास्तरावरील समितीच्या मार्फतीने करण्यात येते. या समितीची सभा नुकतीच पार पडली. सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या एकूण १०३ प्रकरणांपैकी ७६ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून १४ प्रकरणे नामंजूर तर १३ प्रलंबित आहेत. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे (बीपीएल गट) ११८ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ९५ प्रकरणे मंजूर, १२ नामंजूर तर ११ प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. नॉन बीपीएल गटातील श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १८७ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ११० प्रकरणे मंजूर करण्यात आली. ५४ प्रकरणे फेटाळण्यात आली तर २३ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या २५ प्रकरणांपैकी १८ प्रकरणे मंजूर तर ७ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचा एक अर्ज प्राप्त झाला. तो मंजूर करण्यात आला. पाच योजनांचे मिळून ४३४ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ३०० प्रकरणे मंजूर करण्यात आली, ८७ प्रकरणे नामंजूर तर ४७ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.आरमोरी तालुक्यात बीपीएल गटातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार १४, नॉन बीपीएल श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार ७९३, संजय गांधी निराधार योजनेचे १ हजार ३९१, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे २ हजार १४, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे ११४, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेचे २७ लाभार्थी आहेत. एप्रिल ते जून महिन्यात १५ लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत मदत देण्यात आली. आम आदमी योजनेच्या २० तर आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ८४ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.या सर्व योजना ग्रामीण पातळीवर महसूल यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गावच्या तलाठ्याकडे विहित नमुन्यात अर्ज भरून सादर करावे व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरमोरीचे तहसीलदार शशिकांत चन्नावार, नायब तहसीलदार दामाजी नैताम यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
३०० निराधारांना मिळणार अनुदान
By admin | Updated: July 2, 2014 23:19 IST