ठाणेगाव : आरमोरी पंचायती समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव (भू.) ग्रामपंचायतीची ग्रामसभा स्वातंत्र्यदिनी घेण्यात आली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीला मिळालेल्या पुरस्कार रक्कमेच्या खर्चावरून दोन दिवसात तीनदा ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली. स्वातंत्र्यदिनी डोंगरगाव (भू.) येथे दुपारी १२ वाजता ग्रामसभा सुरू करण्यात आली. विषय सूचीनुसार तंटामुक्ती समितीच्या पुरस्कार रक्कमेच्या खर्चावर चर्चा सुरू झाली. २०१२-१३ मध्ये मिळालेल्या रक्कमेतून गावात ओटा व इतर बांधकाम करण्यात आले. याचा हिशोब नागरिकांनी मागितला असता, सचिव दुबे यांनी गावात २२ ओटे बांधण्यात आले आहेत. त्यावर २ ट्रीप विटा, ३ ट्रीप रेती व १०४ थैली सिमेंट वापरण्यात आले. बांधकाम करणाऱ्या गवंड्यास १४० स्क्वेअर फुटाप्रमाणे बांधकाम देण्यात आले होते, असे सांगितले. ३ ट्रीप रेतीच्या बांधकामास १४० थैली सिमेंट कसा काय वापरण्यात आला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. त्यानंतर गोंधळ उडाल्याने ग्रामसभा तहकूब करून पुन्हा त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता घेण्यात आली. परंतु यावेळीही गोंधळ उडाल्याने दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आली. त्यानंतर १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता संवर्ग विकास अधिकारी चव्हाण व गटविकास अधिकारी, पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामसभा सुरू करण्यात आली. परंतु यावेळीही ग्रामसभेतील प्रश्नांवर चर्चा न झाल्याने ग्रामसभा तिसऱ्यांदा तहकूब करावी लागली. (वार्ताहर)
दोन दिवसात तीनदा ग्रामसभा तहकूब
By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST