गडचिरोली : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक आणि राजीनामा सत्रामुळे रिक्त झालेल्या ग्रा. पं. सदस्यांच्या जागेसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातील १0 तालुक्यात २ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व ९७ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. एकूण ९७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. अहेरी तालुक्यातील येडमपल्ली व रेंगुलवाही या दोन ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीची मुदत जुलै व सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता २६ मेपासून आयोगाने लागू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ ते ७ जून या कालावधीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांच्या कारवाया लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रा. पं. निवडणुकीच्या मतदानाची वेळ सकाळी ७.३0 ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात ९७ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यात कोरची तालुक्यातील मोठा झेलीया यांच्यासह कुरखेडा तालुक्यातील ८ ग्रामपंचायत, देसाईगंज ६, आरमोरी ६, गडचिरोली ६, मुलचेरा १0, धानोरा १६, एटापल्ली २३ व अहेरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत. जुन महिन्यात भामरागड व चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार नाही. या तालुक्यातील ग्रा. पं. ची मुदत संपुष्टात आली नाही. तसेच या तालुक्यात राजीनामेही नाही. मात्र १0 तालुक्यात नक्षल कारवायांची सावट अधिक राहत असल्याने भीतीपोटी अनेक ग्रा. पं. सदस्यांनी राजीनामे दिलेत. परिणामी ग्रा. पं. च्या जागा रिक्त झाल्या. दुर्गम भागात लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न नक्षली नेहमी करतात. (स्थानिक प्रतिनिधी)
१0 तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक
By admin | Updated: May 30, 2014 23:44 IST