गडचिराेली, धानाेरा : स्वस्त धान्य वितरणच्या साॅफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला असल्याने मार्च महिना अर्धा संपूनही अजूनपर्यंत धान्याचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे गाेरगरिबांवर उपासमारीचे संकट काेसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वस्त धान्य वितरणातील काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने मागील काही वर्षांपासून धान्य वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानदाराला पाॅस मशीन देण्यात आली आहे. पाॅस मशीनवर संबंधित लाभार्थीचा थम्ब घेतल्यानंतरच धान्य वितरण केले जाते. संबंधित कार्डावर किती धान्य आहे, तसेच धान्याची किंमत किती रुपये झाली, याचे ऑनलाइन बिल पाॅस मशीनमधून निघते. त्यामुळे दुकानदाराला तेवढे धान्य द्यावेच लागते.
पाॅस मशीनमुळे धान्य वितरणातील काळाबाजारावर बराच अंकुश आला आहे. मात्र ही मशीन व साॅफ्टवेअर काम करीत नसल्यास धान्य वितरणात अडचणी निर्माण हाेतात. धान्य वितरणासाठी तयार केलेल्या साॅफ्टवेअरमध्ये मागील १५ दिवसांपासून काही तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहेत. त्यामुळे अर्धा मार्च महिना उलटूनही धान्याचे वितरण झाले नाही. तालुकास्तरावरील गुदामावरून धान्य दुकानात धान्य पाेहाेचले आहे. मात्र तेवढ्या धान्याची नाेंद पाॅस मशीनवर ऑनलाइन पद्धतीने झाली नाही. त्यामुळे दुकानदारांनी अजूनपर्यंत धान्याच्या वितरणाला सुरुवात केली नाही. अनेक गरीब कुटुंब स्वस्त धान्य दुकानातूनच मिळणारे धान्य खातात. मात्र १५ दिवसांपासून धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट काेसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच नागरिकांच्या राेषाचा सामना दुकानदारांना करावा लागत आहे. तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.
बाॅक्स...
नवीन पाॅस मशीन द्या
धानाेरा तालुक्यात एकूण १२६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यातील काही मशीन बिघडल्या आहेत, तर काही मशीन व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी निर्माण हाेतात. नवीन मशीनचा पुरवठा करावा, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जाकीर कुरेशी, तालुका सचिव नरेंद्र उईके, तालुका उपाध्यक्ष सुनीता झंझाळ, प्रमिला गावडे, समीर कुरेशी, जमील शेख, रामचंद्र हलामी, जगन्नाथ राजगडे, अनिल दळांजे यांनी केली आहे.