आमदारांची माहिती : हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रलंबित समस्यागडचिरोली : ७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यातील प्रलंबित समस्यांसंदर्भात ४९ तारांकित प्रश्न, आठ लक्षवेधी व अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी कोटगल, चिचडोह यासारखे सिंचन प्रकल्प तत्काळ मार्गी लावावे, १ हजार ६१० गावातील मामा तलावांमध्ये बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध करावी, धानाला तीन हजार रूपये हमीभाव द्यावा, गडचिरोली जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त होण्याच्या दृष्टीने गौणवनोपजावर आधारित उद्योग निर्मिती करण्यात यावी, मुला-मुलींचे वसतिगृह तसेच आदिवासी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांच्या समस्या अधिवेशनात मांडल्या जातील. आश्रमशाळांच्या अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने या आश्रमशाळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ज्या गावातील आदिवासींची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसातून वगळण्यात यावे, चामोर्शी, धानोरा येथील बसस्थानकांचे बांधकाम करावे, गडचिरोली शहरातील स्त्री रुग्णालयाला कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, झाडे व बंगाली समाजाला आरक्षण लागू करावे आदी मागण्यासंदर्भात आतापर्यंत ४९ तारांकित प्रश्न व ८ लक्षवेधी आॅनलाईन पद्धतीने शासनाकडे पाठविल्या आहेत. आणखी प्रश्न पाठविले जातील, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. पत्रकार परिषदेला बाबुराव कोहळे, सुधाकर येनगंधलवार, प्रमोद पिपरे, गजानन येनगंधलवार, अविनाश महाजन, रमेश भुरसे, अनिल कुनघाडकर, पोहणकर उपस्थित होते.
५७ प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधणार
By admin | Updated: December 5, 2015 09:07 IST