गडचिरोली : थेट अनुदान योजनेला २५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेक गॅस ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गॅस ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले असून या नवीन पध्दतीविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गॅस एजन्सीच्या मार्फतीने वितरणात होणारे गैरव्यवहार थांबविण्यासाठी यापूर्वीच्या केंद्र शासनाने थेट अनुदान योजना सुरू केली होती. मात्र त्यावेळीसुध्दा या योजनेबाबत नागरिकांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आल्यानंतर सदर सरकारने या योजनेला काही दिवस स्थगिती दिली होती. भाजपाच्या नवीन सरकारने री ओढत सदर योजना जशीच्यातशी १ जानेवारीपासून लागू केली. एकावेळेस योजना लागू झाल्याने नागरिकांची फार मोठी तारांबळ उडाली. अनेक ग्राहकांनी हातचे काम बाजुला सारून गॅस खाते बँक खात्यासोबत लिंक केले. तेव्हापासून ग्राहकांनी गॅस सिलिंडरसाठी ८१० रूपये भरले आहेत. ४६० रूपये गॅस सिलिंडरची किंमत वगळून उर्वरित अनुदान ३५० रूपये दोन ते तीन दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये जमा होईल, असे शासनाकडून तसेच गॅस एजन्सी मालकांकडून सांगण्यात येत होते. मात्र आता २५ दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक ग्राहकांच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे गॅस ग्राहक आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. यापूर्वी केवळ ४६० रूपयांमध्ये गॅस मिळत होती. आता ८१० रूपये भरावे लागत आहेत. अनेक गरीब कुटुंबाना एवढी मोठी रक्कम गोळा करणे अशक्य झाले आहे. या योजनेमुळे गैरव्यवहाराचे प्रमाण कमी झाले असले तरी अनुदान जमा होत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (नगर प्रतिनिधी)
गॅस अनुदान थकले
By admin | Updated: January 25, 2015 23:14 IST