११५ वैदुंनी लावली हजेरी : आयुर्वेदावर आज होणार मार्गदर्शनगडचिरोली : चवथ्या वैदू संमेलनाला आज शनिवारी गडचिरोली येथे प्रारंभ झाला. मध्यवर्ती काष्ठ भंडार वनविभाग गडचिरोली यांच्या परिसरात भरलेल्या या संमेलनाचे उद्घाटन आर्ट आॅफ लिव्हिंगचे आनंद व हार्दिक महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक लक्ष्मी अन्नाबत्तुला, देसाईगंजचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सिरोंचाचे उपवसंरक्षक शुक्ला, भामरागडचे उपवनसंरक्षक हलमारे, आत्माचे संचालक अनंत पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना मुख्यवनसंरक्षक रेड्डी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारची वनस्पती आहे. या वनस्पतीपासून वनौषधी तयार करून अनेक रूग्णांना बरे करता येऊ शकते. जिल्ह्यातील वैदुंना वनौषधीची परिपूर्ण माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने गडचिरोलीत गोंडवाना हर्ब, वनौषधी संकलन व प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये ४५ प्रकारचे चूर्ण आहेत. भविष्यात गडचिरोली जिल्हा हा आयुर्वेदिक जिल्हा म्हणून नावारूपास यावा, असेही मुख्यवनसंरक्षक रेड्डी यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील वैदुंनी वनौषधीचे संकलन करून वैदू संघटना मजबूत करावी. जेणेकरून वनौषधीच्या माध्यमातून अनेक रूग्णांना लाभ होईल, याकरीता वैदुंना वनविभागामार्फत आवश्यक ते पूर्ण सहकार्य सतत लाभेल, असेही रेड्डी यावेळी म्हणाले.याप्रसंगी आर्ट आॅफ लिव्हिंगचे हार्दिक व आनंद महाराज यांनी विविध वनौषधी व आयुर्वेदाबाबत सखोल माहिती दिली. आयुर्वेदातून मानसाचे आयुष्य वाढविता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला, आदर्श रेड्डी, अनंत पोटे यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी अनेक वैदुंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला वनौषधी वैदू मंडळाचे सचिव डॉ. प्रशांत भरणे यांच्यासह गडचिरोली वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
वैदू संमेलनाला गडचिरोलीत प्रारंभ
By admin | Updated: November 29, 2014 23:20 IST