अभिनय खोपडे - गडचिरोलीभाजपचा गड असलेला गडचिरोली विधानसभा मतदार संघ २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत या मतदार संघात भाजप उमेदवाराने तब्बल १ लाख १५ हजार १६७ मते घेत ६९ हजार ९ मतांची आघाडी मिळविली. या गडावर पुन्हा आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे हा गड आपल्याकडे कायम राखण्यासाठी काँग्रेसला मोठी झुंज द्यावी लागत आहे. त्यातच या निवडणुकीत काँग्रेस-राकाँची आघाडी दुभंगली तर भाजपचाही शिवसेनेने साथ सोडला. त्यामुळे काँग्रेस व भाजपला जोरदार मेहनत घ्यावी लागत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसह गडचिरोली नगर पालिकेचा कारभार सांभाळणारे धुरिणी भाजपसोबत होते. त्यामुळे भाजपला गडचिरोली शहरात मोठे मताधिक्य मिळविणे सहज शक्य झाले होते. शिवाय चामोर्शी व धानोरा तालुक्यातही भाजपने मुसंडी मारली होती. मात्र अवघ्या ७ महिन्यात बरेच पाणी वाहून गेले आहे. नगर परिषदेचा कारभार सांभाळणारे प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह त्यांचे समर्थक भाजपासून दुरावले आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ताकत नसलेल्या शिवसेनेला ताकत देण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू आहे. सध्यातरी या मतदार संघात चौरंगी लढत होईल, असे दिसत आहे. खरा सामना काँग्रेसच्या सगुणा तलांडी, भाजपचे देवराव होळी, शिवसेनेचे केसरी उसेंडी व राष्ट्रवादीच्या भाग्यश्री आत्राम यांच्यात आहे. मात्र याशिवाय बसपाचे विलास कोडाप, भारिप बहुजन महासंघाचे कुसूम आलाम , मनसेच्या रंजिता कोडाप किती मते आपल्याकडे खेचतात, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीने त्रस्त झालेले गैरआदिवासी मतदार नोटाचा वापर करतो असे सांगत आहे. त्यांनी नोटा वापरला तर निवडणुकीचे राजकीय समिकरण बदलण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुजन समाजाचा मतदार वळविण्यासाठीही उमेदवाराचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. मात्र या मतदार संघात चामोर्शी हा सर्वात मोठा तालुका आहे व येथेच सर्वाधिक मतदार आहेत. या तालुक्यातून केवळ भाजप या एकमेव पक्षाचा उमेदवार आहे. काँग्रेस, भाजपच्या व्होट बँकमध्ये खिंडार पाडण्यासाठी भाजप व शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमधील नाराजांना जवळ करण्याचे प्रयत्न येत्या दोन-तीन दिवसात सुरू होतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नाराजांची यादी मोठी आहे. त्यांच्यावर इतर पक्षीयांची नजर आहे. काँगे्रसकडे अनुसूचित जाती तसेच जमाती व मुस्लिम मतदारांची पक्की व्होट बँक आहे. शिवाय आदिवासींच्या आरक्षणात इतरांचा शिरकाव होऊ देणार नाही, अशी कणखर भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. त्यामुळे आदिवासी मतदार काँग्रेसच्या बाजुने वळू शकतो, असा जाणकारांचा दावा आहे.या सर्व घटनाक्रमांमुळे सध्यातरी या मतदार संघात बहुरंगी लढत होईल, असे चित्र दिसून येत आहे. मात्र बहुतांशी पक्षाची राजकीय नेते मंडळी १२ तारखेनंतर आपापल्या भूमिका जाहीर करणार असल्याने त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. सध्यातरी थेट लढत या मतदार संघात होईल, असे दिसत नाही. बहुजन समाजाच्या मतदारावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.
गडचिरोली मतदार संघात चुरस कायम
By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST