लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याला शुक्रवारी (२५ जुलै) सलग तिसऱ्या दिवशी संततधार पावसाचा तडाखा बसला. नद्या, नाले तुडुंब झाले असून, भामरागडमध्ये पर्लकोटा नदीला पूर आला. पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडसह शंभरवर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.
पुरामुळे आलापल्ली-भामरागड मार्ग बंद असून, जिल्ह्यातील पाच मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' जारी केल्याने दक्षिणेकडील शाळा, महाविद्यालयांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली होती. मागील २४ तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ९९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल एटापल्ली तालुक्यात ६८.४ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील नऊ विभागांमध्ये अतिवृष्टी झाली असून, ताडगाव परिसरात १२० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग बंद आहे. यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा असरअली, ताडगाव-दामरंचा व अहेरी-वट्रा हे मार्गही बंद आहेत.
वैनगंगा नदीत वाहून आला अनोळखी मृतदेह
- चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर येथील वैनगंगा नदीच्या काठावरील कोनसरी स्टील प्रकल्पाच्या हॅड्रॉनजवळ पुराच्या पाण्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
- २५ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता हा मृतदेह स्थानिकांना वाहून येत असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली. आष्टी ठाण्याचेपोलिस निरीक्षक विशाल काळे सहकाऱ्यांसह नदीकाठी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनसाठी पाठविला. मयत इसम हा अंदाजे ४० वर्षांचा आहे.
- तहसील प्रशासनाला ही माहिती कळवली असून मृताची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले.