कुरखेडा : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील दलित कुटुंबातील तीन व्यक्तींची अमानुष हत्या करण्यात आली. मात्र या हत्याकांडातील आरोपींचा अद्यापही शोध लागला नाही. दलित हत्याकांडातील आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज मंगळवारला कुरखेडा येथे बौध्द समाज तालुका संघर्ष समितीच्यावतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे, आज दिवसभर कुरखेडातील बाजारपेठ बंद ठेवून दलित हत्याकांडाचा निषेध करण्यात आला. बौध्द समाज तालुका संघर्ष समिती कुरखेडाच्यावतीने या मोर्चाची सुरूवात येथील आंबेडकर चौकातून करण्यात आली. या मोर्चादरम्यान शहरातील व तालुक्यातील शेकडो बौध्द समाज बांधव नारेबाजी करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी टोनगावकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. जवखेडा दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी कुरखेडाचे तहसीलदार तोडसाम, नायब तहसीलदार सुखदेव वासनिक आदी उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सहारे यांनी केले. मोर्चात जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, भन्ते संघ ज्योती, नलिनी माने, ग्रा.पं. सदस्य नारायण टेंभुर्णे, रोहित ढवळे, प्रमोद सरदारे, कार्तिक लाडे, जगदिश डोंगरे, नाना वालदे, सिध्दार्थ वालदे, खेमराज धोडणे, यादव सहारे, साईनाथ सरदारे, शिवचरण जनबंधू, प्रमानंद भैसारे, मनोज लोखंडे, महेश सहारे, माणिक डोंगरे, गितेश जांभुळे आदीसह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एसडीओ कार्यालयावर मोर्चा धडकला
By admin | Updated: November 25, 2014 22:55 IST