लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आलापल्ली जवळील मोदूमोडगू येथील शासकीय धान्य गोदामातून तांदूळ आणि गव्हाचा अपहार केल्याप्रकरणी एका आरोपीला अहेरी पोलिसांनी अटक केली आहे. यात आणखी काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे.
तहसील कार्यालय अहेरी येथील निरीक्षण अधिकारी व्यंकटराव वैरागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अहेरी तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मोदूमोडगू येथील शासकीय धान्य गोदामातून एकूण १६ लाख रुपये किमतीचे सुमारे ५६२.६६ क्विंटल तांदूळ आणि ६ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५९ क्विंटल गहू तपासणीदरम्यान कमी आढळून आले. एकूण २२ लाख ४६ हजार रुपयांच्या धान्याची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अहेरीचे पोलिस निरीक्षक स्वप्निल ईज्जपवार यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक करुणा मोरे यांनी तपासाअंती गोडाऊन कीपर राजेश ताकवले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. राजेश ताकवले यांना अटक करण्यात आली आणि तीन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांना नायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
या प्रकरणात सखोल चौकशी करुन पाळेमुळे खोदून काढावेत, त्यात अनेक बड्या माशांचा सहभाग निघेल, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले.
तिघांची केली चौकशीया प्रकरणात आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे. अहेरी पोलिस प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करत असून गुरुवारी आणखी तीन लोकांना चौकशीसाठी बोलाविले आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कार्यवाही सुरू होती.
केंद्रांवरील तुटीची चौकशी करण्याची मागणी
- हमीभाव धान खरेदी केंद्रांवर संबंधित अभिकर्ता संस्था तुट दाखवून मोठ्या प्रमाणावर धानाची अफरातफर करतात. यापूर्वी असे प्रकार एटापल्ली व धानोरा तालुक्यात उघडकीस आले आहेत.
- अहेरी तालुक्यातही असा प्रकार झाल्याची शंका वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी धानाची योग्यप्रकारे व्यवस्था न करता पावसात धान भिजन सडतो.
- अभिकर्ता संस्थांना ताडपत्र्यांचे वितरण करूनही धानाची योग्य देखरेख केली जात नाही. याउलट तुट दाखवून मोठ्या प्रमाणावर धानाची अफरातफर केली जाते.