आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व उपप्रादेशिक कार्यालय घोट अंतर्गत धान खरेदी केल्या जाते. मात्र, २०१९ -२० मध्ये किमान आठ ते दहा कोटी रुपयांचे ४१,२९६.४० क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. या ठिकाणाहून दोन वर्षांच्या कालावधीत २१,००० क्विंटल धानाची उचल करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही चार कोटी रुपयांचे २०,००० क्विंटल धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर पडून आहेत.
माल खराब होत असूनही आदिवासी विकास महामंडळ व शासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. पावसाळ्यापूर्वी मालाची उचल करून मानवाच्या आरोग्यास हानी होणार नाही त्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने दरवर्षी संस्थांमार्फत धानाची माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, भरडाईची प्रक्रिया विलंबाने हाती घेण्यात येत असल्याने केंद्रावरून धानाची उचल करण्यास दिरंगाई हाेते. गडचिराेली जिल्ह्यात धान उत्पादन व खरेदीच्या तुलनेत गाेदामाची संख्या कमी आहे. पुरेशी व सुरक्षित साठवणूक व्यवस्था नसल्याने खरेदी केलेल्या धानाचे दरवर्षी नुकसान हाेते. गेल्या १० ते १५ वर्षात उघड्यावरील धान खराब हाेऊन शासनाचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाॅक्स....
अहेरी उपविभागात सहा लाख क्विंटलची धान खरेदी
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिराेली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत खरीप हंगामात ५४ केंद्रांवरून धानाची खरेदी करण्यात आली. अहेरी उपविभागात ३९ धान खरेदी केंद्र ठेवण्यात आले हाेते. गडचिराेली हद्दीतील ५४ केंद्रांवरून १० लाख २७ हजार ३४३ क्विंटल तर अहेरी उपविभागातील ३९ केंद्रांवरून ६ लाख २६ हजार २३८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. दाेन्ही कार्यालये मिळून जिल्हाभरात महामंडळाच्या वतीने सन २०२०-२१ या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी याेजनेअंतर्गत एकूण १६ लाख ५३ हजार ५८१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.