लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व आकांक्षित गडचिरोलीतील लोह उत्खनन व पोलाद निर्मिती प्रकल्पांचा विस्तार होऊ घातला आहे. यासंदर्भात पर्यावरण विभागाकडून जनसुनावणी घेतली जाणार आहे. या प्रकल्पांच्या विस्तारामुळे कोणत्याही गावाचे विस्थापन होणार नाही, अशी स्पष्टोक्ती प्रशासनाने दिली, त्यामुळे सुरजागड प्रकल्पाच्या परिसरातील गावांना दिलासा मिळाला आहे.
शासनाने लायड्स मेटल्स एनर्जी लिमिटेड या कंपनीला सुरजागड (ता. एटापल्ली) येथील ३४८ हेक्टर वनजमीन २००७-२००८ मध्ये लोह खनिज उत्खननासाठी लीजवर दिली होती. या प्रकल्पाचा विस्तार होणार असून त्याची जनसुनावणी २८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे. यासोबतच हेडरी, बांडे व परसलगोंदी येथील प्रकल्पांची जनसुनावणीही त्याच दिवशी पार पडणार आहे. त्यामुळे या परिसरात कोणत्याही गावाचे विस्थापन केले जाणार नसल्याची माहिती एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी व परीविक्षाधीन अधिकारी (आयएएस) नमन गोयल यांनी दिली. त्याआधी २३ जानेवारीला कोनसरी (ता. चामोर्शी) येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या विस्ताराबाबत पर्यावरण विषयावर जनसुनावणी होऊ घातली आहे. यातून परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. याचा आदिवासीबहुल गावांना फायदा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारल्याने अपेक्षा जिल्हा औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने पुढे जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला स्टील सिटी बनवू, अशी भिष्मप्रतिज्ञा केली आहे. सोबतच पालकत्व स्वतःकडे कायम ठेवले आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यातून आदिवासीबहुल भागात रोजगारनिर्मिती होऊन शिक्षण, आरोग्याचे प्रश्न दूर होऊन आर्थिक स्थैर्य येईल, अशी अपेक्षा आहे.
सामाजिक उपक्रमांतून बदलले जीवनमान
- लॉयड मेटल्सच्या लोह उत्खनन प्रकल्पांना सुरुवातीला स्थानिकांचा विरोध होता. मात्र, कंपनीने सामाजिक दायित्व निभावत सामान्यांचे जीवनमान बदलले.
- या भागात कंपनीतर्फे इंग्रजी माध्यमाची शाळा, अत्याधुनिक दवाखाना, युवकांना तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा प्रबोधिनीतून खेळाडूंना प्रोत्साहन तसेच गरीब, गरजूंना मदत असे विविध उपक्रम राबविले जातात. यातून स्थानिकांचा विरोध मोडीत निघाला आहे. सुरजागड परिसरातील बेरोजगार युवकांच्या हातांना काम मिळाल्याने त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आहे.